कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |धृ |
प्रेम अर्पावे सर्वांना माय फक्त हेच जाणे
दीन अनाथ लेकरा भरविले घास तिने
भुकेजल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे
सौभाग्याचा अलंकार तोही टाकिला विकून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |१|
कोणकोणाची ही मुले काय होते नाते तिचे ?
लळा लाविला सर्वांना राज्य निर्मी ममतेचे
इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे
अभिमान आम्हा तिचा जीव टाकू ओवाळून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |२|
पती रयतेचा वाली सती रयत माऊली
सरस्वतीला भेटाया जणू लक्ष्मी धावली
भेद विसरूनी सारे बने सर्वांची सावली
वावरली जन्मभरी छाया पतीची बनून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन? |३|
लाखलाख मुले आज माय वंदिताती तुला
हेवा करावा देवांनी असे भाग्य लाभे तुला
तुझ्या त्यागतुनी माते कर्मवीर जन्मा आला
मूर्त तुझी ठेवू आम्ही हृदयात साठवून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |४|